
उद्यमबाग पोलिसांची कारवाई
बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी गांजामिश्रित अमली पदार्थांच्या चॉकलेट पाकिटांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ किलो ८५८ ग्रॅम वजनाची गांजामिश्रित चॉकलेट पाकिटे तसेच मोबाईल, रोख रक्कम आणि स्कूटी असा एकूण ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलू पिता जित्ताल प्रजापती (वय ३९, रा. हनुमाननगर, बेळगाव; मूळ रा. चम्रुपूर, प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा आरोपी उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील के.एल.ई. इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील सार्वजनिक रस्त्यालगत गांजामिश्रित अमली पदार्थांच्या चॉकलेट पाकिटांची विक्री करत होता.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीकडून ५४ हजार रुपये किमतीची ६ किलो ८५८ ग्रॅम वजनाची गांजामिश्रित अमली पदार्थांची २७ चॉकलेट पाकिटे, १० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, ६०० रुपये रोख आणि ३० हजार रुपये किमतीची स्कूटी, असा एकूण ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम २०(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी, पीएसआय (अवि) प्रविण बिरादार, पीएसआय (का.सु.) यू.बी. कट्टीकर यांच्यासह के.के. सवदत्ती, उदयकांत मासन्नवर, महेश सिद्धप्पा वडेर, ईरण्णा चवलगी, हनमंत सीतिमनी, राजशेखर बी. मदिहळ्ळी आणि महिला पोलीस कर्मचारी दीपा अनंतपूर यांनी सहभाग घेतला.
पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईचे पोलीस आयुक्त, उपपोलीस आयुक्त (का.सु.) आणि उपपोलीस आयुक्त (अवि.) यांनी कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta