
बेळगाव : शिवम असोसिएट कंपनीचे मालक शिवानंद नीलण्णवर यांच्याविरोधातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरू ठेवली आहे.
बेळगावातील शिवबसव नगर येथील एम.एच. टॉवरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. सीआरपीएफच्या जवानांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. गोवा आणि मंगळूर येथून आलेले ईडी अधिकारी या तपास मोहिमेत सहभागी झाले असून, कालपासूनच कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदींची छाननी सुरू आहे.
मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांशी संबंधित एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने शिवानंद नीलण्णवर यांच्या घरासह संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली आहे. कालपासून ईडी अधिकाऱ्यांनी नीलण्णवर यांची दीर्घकाळ चौकशी केली असून, कागदपत्रांच्या तपासणीसोबतच आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि इतर आर्थिक उलाढालींबाबत माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, शिवानंद नीलण्णवर यांच्या पत्नी आणि भावाचीही ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. विविध कागदपत्रे तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती अधिकाऱ्यांकडून संकलित केली जात आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही ईडीची शोधमोहीम सुरू असल्याने या प्रकरणाचा तपास अधिक गतिमान झाला आहे. ईडीच्या तपासणीतून पुढील काळात या प्रकरणाशी संबंधित आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta