
बेळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून खून केल्याची धक्कादायक घटना चिक्कोडी तालुक्यातील खडकळाट गावात उघडकीस आली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्येचा प्रकार आता समोर आला असून, खडकळाट पोलिसांनी मृताच्या पत्नी बंगारी गावडे आणि तिचा प्रियकर रामा राणगे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मृताचे नाव राघू गावडे (४०) असे आहे.
राघू गावडे हे मजुरी तसेच मेंढ्या राखण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांची पत्नी बंगारी हिचे राघूच्या नात्यातील रामा राणगे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या संबंधाला पती राघू यांचा विरोध असल्याने दोघांनी मिळून त्यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचे सांगण्यात येत आहे.
कटानुसार बंगारीने राघू यांना शेतात बोलावून घेतले. तेथे प्रियकर रामा राणगे याच्या मदतीने त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावून राघू मेंढ्या राखण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याचे भासवून बंगारीने कुटुंबीय आणि ग्रामस्थांची दिशाभूल केली.
सुमारे सहा महिने राघू बेपत्ता असतानाही कुटुंबीयांनी बंगारीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा शोध घेतला. मात्र राघूचा भाऊ लगमण्णा यांना या प्रकरणाबाबत संशय आला. त्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
गावातील ज्येष्ठांनी बंगारीची चौकशी केली असता अखेर तिने सत्य सांगितल्याचे समोर आले. त्यानंतर लगमण्णा यांनी खडकळाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून बंगारी गावडे आणि रामा राणगे यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास खडकळाट पोलीस करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta