
बेळगाव : हातमाग कारखान्यात काम करणारे विठ्ठल लोकरी यांनी कर्जाच्या बोजामुळे १६ ऑगस्ट २०२६ रोजी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच कुटुंबावरील सुमारे ६ लाख रुपयांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी कूली नेकार कामगार संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले.
बेळगाव शहरातील वडगाव आणि खासबाग परिसर हातमाग व यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. या उद्योगावर हजारो महिला आणि पुरुष कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, अनेक कामगारांना किमान वेतन, ईएसआय, पीएफ आणि बोनस यांसारख्या कायदेशीर सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, विठ्ठल लोकरी यांनी पत्नीच्या उपचारांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुमारे ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. वाढता कर्जबोजा आणि आर्थिक अडचणींमुळे ते त्रस्त होते. अखेर १६ ऑगस्ट रोजी त्यांनी आपण काम करत असलेल्या हातमाग कारखान्यात आत्महत्या केली.
लोकरी यांच्या निधनामुळे त्यांच्या आजारी पत्नी आणि तीन मुलींवर मोठे संकट कोसळले आहे. मोठी मुलगी प्रथम पीयूसीमध्ये, दुसरी आठवीत, तर तिसरी मुलगी तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. वडिलांच्या निधनानंतर मुलांचे शिक्षण, आईच्या उपचारांचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांची जबाबदारी कुटुंबासमोर उभी राहिली आहे.
हातमाग व यंत्रमाग उद्योगासाठी शासन विविध सवलती आणि आर्थिक योजना राबवत असले, तरी त्याचा अपेक्षित लाभ प्रत्यक्ष कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप संघटनेने केला. वाढती महागाई, मजुरीत वाढ न होणे आणि काही ठिकाणी मजुरी कपात यामुळे कामगारांची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
कामगारांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच विठ्ठल लोकरी यांच्या कुटुंबाला तातडीने २५ लाख रुपयांची मदत आणि ६ लाख रुपयांचे कर्जमाफी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही संघटनेने म्हटले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta