
बेळगाव : महिला पोलीस उपनिरीक्षकाशी (PSI) संबंधित अश्लील व्हिडिओ प्रकरणाला आता हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे नाव जोडले गेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कारागृहाची बदनामी करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करत हिंडलगा केंद्रीय कारागृहाच्या सहाय्यक अधीक्षकांनी बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या संध्या नागराज यांच्यासह काही व्यक्तींविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. द्वितीय जेएमएफसी न्यायालयातील सरकारी अभियोक्ता महांतेश यांच्या माध्यमातून तक्रार सादर करण्यात आल्याचे समजते.
अलीकडे एका खासगी व्यक्तीसोबत कथितरीत्या अश्लील व्हिडिओ कॉल करणाऱ्या महिला PSI शी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. हा व्हिडिओ ‘Sandhya777nagraj’ या इन्स्टाग्राम खात्यावरून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या पोस्टमध्ये संबंधित व्हिडिओ हिंडलगा कारागृहातच चित्रित झाल्याचा आभास निर्माण करणारी माहिती देण्यात आली होती, असा कारागृह प्रशासनाचा आरोप आहे. तसेच गृह विभागाचे मंत्री प्रियांक खर्गे आणि कारागृह सुधारणा विभागाच्या एडीजीपींची छायाचित्रे वापरून पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, संबंधित महिला PSI आणि हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचा कोणताही संबंध नसल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कारागृहाचे नाव वापरून अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे कारागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा मलीन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
याच प्रकरणाच्या अनुषंगाने यापूर्वी हिंडलगा कारागृहात असलेल्या तुमकूर येथील कैदी साईकुमार याच्याविरुद्धही तक्रार करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.
कारागृहाबाबत खोटी व अवमानकारक माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून संबंधितांविरुद्ध बीएनएस कलम 356(2) आणि 356(3) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीवर न्यायालयीन प्रक्रियेत पुढील निर्णय होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta