
खानापूर : तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, आता रस्त्यांवरील खड्ड्यांवरून चक्क गाणी तयार होऊ लागली आहेत. गावोगावी या समस्येची चर्चा सुरू असतानाही लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून असल्याची टीका नागरिकांतून होत आहे.
तालुक्यातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्ता आहे की खड्डे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार ते सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलेले नवीन रस्तेही उखडू लागल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रस्त्यांची ही अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित आमदार, खासदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यावर ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी रस्त्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारी भाजपा आणि एकीकरण समितीही आता खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी पूर्वीसारखी रस्त्यावर उतरताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
जांबोटी परिसरातील समस्यांकडेही दुर्लक्ष?
जांबोटी परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, डांबर उखडले आहे, खड्डे पडले आहेत आणि नवीन रस्तेही काही महिन्यांत खराब झाले आहेत. तरीही स्थानिक नागरिक आणि नेतेमंडळी शांत असल्याचे चित्र आहे. याशिवाय परिसरातील पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला असताना त्यावरही अपेक्षित आवाज उठत नसल्याची चर्चा आहे.
याउलट तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी काही काळापूर्वी रस्त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. इटगी परिसरात रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की, ‘रस्ता’ नावाची गोष्टच उरली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे नागरिकांना अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली.
संपूर्ण तालुकाच खड्डेमय
तालुक्यातील विविध भागांतील परिस्थिती पाहता संपूर्ण तालुकाच खड्डेमय झाल्याचे चित्र आहे. खराब रस्ते, निकृष्ट दर्जाची कामे, अल्पावधीत उखडणारे नवीन रस्ते आणि पाण्याच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील विविध प्रश्नांवर पूर्वी आक्रमक भूमिका घेणारे भाजपा कार्यकर्ते आणि नेतेही सध्या गप्प असल्याची टीका होत आहे. राम मंदिर चोरी प्रकरणानंतरही स्थानिक पातळीवर अपेक्षित आवाज उठला नसल्याने त्यांच्या या ‘मौनावस्थे’बाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निवडणुकीच्या काळात आश्वासने आणि आता मौन, अशी परिस्थिती कायम राहणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत असून, लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta