Monday , August 24 2026
Breaking News

मालकी नसतानाही जमीन हडपण्याचा डाव; बनावट जीपीएप्रकरणी महिला अटकेत

Spread the love

 

करंबळच्या एक एकर जमिनीचा परस्पर व्यवहार करण्याचा प्रयत्न; दोघे पोलिसांच्या रडारवर

बेळगाव : जमीन व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस गंभीर होत असताना, आपणच जमिनीचे मूळ मालक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीचा डाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खानापूर तालुक्यातील करंबळ येथील तब्बल एक एकर कृषी जमिनीचा परस्पर व्यवहार करण्यासाठी बनावट जनरल पॉवर ऑफ अटर्नी (जीपीए) तयार करून त्याची उपनोंदणी कार्यालयात नोंद करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

मेहजबिन शिराज मुल्ला (वय 37, रा. झटपट कॉलनी, अनगोळ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणामुळे जमीनमालकांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नावगे येथील लीना अँथोनी डिसोझा (वय 50) यांनी 18 मार्च 2025 रोजी मार्केट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. आपल्या मालकीची जमीन विकण्यासाठी एका महिलेने परस्पर आपल्या नावाने जीपीए तयार करून तो दक्षिण उपनोंदणी कार्यालयात नोंद केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जमीनमालकाच्या संमतीशिवाय अशा प्रकारे व्यवहाराचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला.

तपासादरम्यान कृषी जमीन विक्रीसाठी जीपीए तयार करून देण्याची कबुली मेहजबिन मुल्ला हिने दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या प्रकरणात तिला मदत करणारे पवन कांबळे आणि राजू कुडची यांचीही नावे समोर आली असून, त्यांच्या भूमिकेचा पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिरची, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, एच. एल. केरूर व त्यांच्या पथकाने कारवाई करत मेहजबिन मुल्ला हिला रविवारी अटक केली.

जमिनीच्या बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

या प्रकरणात बनावट जीपीए तयार करण्यापासून ते त्याची उपनोंदणी कार्यालयात नोंद करण्यापर्यंत कोणाकोणाचा सहभाग होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पवन कांबळे आणि राजू कुडची यांचा शोध घेण्यात येत असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

जमिनीच्या मालकी हक्काचा गैरफायदा घेत परस्पर व्यवहार करण्याच्या या प्रकारामुळे जमीनमालकांनी आपल्या मालमत्तेच्या कागदपत्रांबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

एक लाखांहून अधिक बेलपत्रांचा हार कपिलेश्वर चरणी!

Spread the love  बेळगाव : श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारनिमित्त दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *