Wednesday , August 26 2026
Breaking News

बळ्ळारी नाल्याच्या प्रदूषणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; दूषित पाणी रोखण्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : बळ्ळारी नाल्यात मिसळणारे दूषित पाणी, नाल्याची दुरवस्था आणि त्याचा शेतीवर होणारा गंभीर परिणाम याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत बळ्ळारी नाल्याच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. दूषित पाण्याचा स्रोत शोधून तो तातडीने बंद करावा, नाल्यातील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

येळ्ळूर परिसरातील केएएलई भागातून बळ्ळारी नाल्यात दूषित पाणी सोडले जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. तसेच काही रुग्णालयांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळेही नाल्याचे प्रदूषण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून प्रदूषणाचा नेमका स्रोत निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली.

प्रदूषित पाण्याचा पिकांसह जमिनीवरही परिणाम

बळ्ळारी नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि जलवनस्पती साचल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. पावसाळ्यात नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने पाणी शेतांमध्ये शिरते. त्यातच प्रदूषित पाणी शेतात साचल्याने पिकांचे नुकसान होण्याबरोबरच जमिनीच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

नाल्यातील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि प्रदूषणामागील नेमके कारण शोधावे, अशी मागणी जयराज हलगेकर यांनी केली.

नाल्याची युद्धपातळीवर सफाईची मागणी

बळ्ळारी नाल्याची अनेक वर्षांपासून नियमित सफाई झालेली नसल्याने गाळ आणि जलवनस्पतींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाल्याची युद्धपातळीवर सफाई करून गाळ काढावा आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

नाल्यालगतच्या शेतकऱ्यांनी यापूर्वीही प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. ९ जुलै २०२५ रोजी लघु पाटबंधारे व भूजल विकास विभागाकडे नाला स्वच्छ करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

अतिक्रमणांमुळे जलनिचऱ्याचा प्रश्न गंभीर

बळ्ळारी नाल्यालगतच्या नैसर्गिक जलमार्गांवर तसेच छोट्या जलवाहिन्यांवर अतिक्रमणे झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा बाधित होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नाल्याची मूळ हद्द निश्चित करून अधिकृत सर्वेक्षण करावे, बफर झोन निश्चित करावा आणि अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी राजू मर्वे यांनी केली.

“केवळ पाहणी नको, कायमस्वरूपी उपाय हवा”

शेतकरी नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “आता केवळ पाहणी आणि आश्वासन नको. बळ्ळारी नाल्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यासह बळ्ळारी नाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.

माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. अमोल देसाई यांनी बळ्ळारी नाल्याचा इतिहास आणि सद्यस्थिती मांडत प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची गरज व्यक्त केली.

बैठकीस रमाकांत कोंडुस्कर, शंकर बाबली महाराज, अमोल देसाई, मनोहर हलगेकर, राजू मर्वे, नितीन खन्नूकर, देवकुमार बिरजे, जयराज हलगेकर, माधुरी जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तुरमुरीत मटक्याचा डाव उधळला; बुकिला बेड्या

Spread the love  तलावानजीक मटका नंबर घेण्याचा उद्योग; ग्रामीण पोलिसांचा छापा, रोकड व चिठ्ठ्या जप्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *