

निपाणी (वार्ता) : पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे “पाली-मराठी” भाषेचे पहिले शब्दकोशकार लोकशिक्षक बाबा भारती यांच्या नावाने “लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार” देण्यात येतो. यावर्षीच्या २०२६ च्या २८ व्या पुरस्काराचे मानकरी सीमा भागातील परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. एन. डी. जत्राटकर यांना देण्यात आला. त्यानिमित्त निपाणी फाउंडेशनतर्फे डॉ. एन डी जत्राटकर यांचा प्रशांत गुंडे दत्तात्रय खोत प्रा. नानासाहेब जामदार, सेवानिवृत्त उपप्राचार्य आर. के. दिवाकर, जयराम मिरजकर, विठ्ठल वाघमोडे, सुधाकर माने, डी. बी. शिरगुप्पे मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून डॉ. एन. डी. जत्राटकर यांनी, आजपर्यंत निरपेक्षपणे समाजसेवा केली आहे. त्याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाला. याचे श्रेय सीमा भागातील समस्त जनतेला जात असल्याचे सांगितले.
प्रारंभी मराठी भाषा संवर्धनात मैलाचा दगड ठरलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचे निधन झाले. त्यांनी आयुष्यभर मराठी भाषा व त्याचे व्याकरण याच्या संवर्धनासाठी काम केले. त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. नानासाहेब जामदार यांनी शेख यांच्या जीवन कार्याचा व मराठी भाषा व्याकरण संशोधनाचा सविस्तर आढावा घेतला. प्रा. नानासाहेब जामदार, प्रा. एन. आय. खोत, सेवानिवृत्त उपप्राचार्य आर. के. दिवाकर, विठ्ठल वाघमोडे, जयराम मिरजकर, दत्तात्रय खोत, डी. बी. शिरगुप्पे, सुधाकर माने फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत गुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वनाथ किल्लेदार, फोर- जे आर ह्यूमन राइट्सचे अशोक खांडेकर, राजश्री चव्हाण, आवटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
प्रमोद कांबळे यांनी सूत्रसंचालन, बाबासाहेब मगदूम यांनी आभार मानले.


Belgaum Varta Belgaum Varta