

तलावानजीक मटका नंबर घेण्याचा उद्योग; ग्रामीण पोलिसांचा छापा, रोकड व चिठ्ठ्या जप्त
बेळगाव : तुरमुरी येथे तलावाच्या परिसरात खुलेआम मटका नंबर घेण्याचा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी धडक कारवाई करत मटका बुकिला अटक केली. मारुती चंद्रकांत मोटेकर (वय 38, रा. लक्ष्मी गल्ली, होनगा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
तुरमुरी गावातील तलावानजीक एक व्यक्ती मटका नंबर घेत असल्याची खात्रीशीर माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक नागगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टीमनी, गौडर व पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.
पोलिसांची चाहूल लागताच परिसरात खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी संशयित मोटेकर याला ताब्यात घेत मटका व्यवहाराचा डाव उधळून लावला. कारवाईदरम्यान त्याच्याकडील रोख रक्कम व मटका चिठ्ठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
दरम्यान, या प्रकरणी मोटेकरविरुद्ध कर्नाटक पोलिस कायद्यानुसार (KP Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.


Belgaum Varta Belgaum Varta