

वृषाली हरिहर; कुर्लीत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा
निपाणी (वार्ता) : कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती व्यक्तीच्या विचारांना, भावनांना आणि कल्पनाशक्तीला योग्य दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी, सर्जनशील विचार विकसित करण्यासह सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी कला महत्वाची असल्याचे मत लंडन येथील आर्टिस्टिक डायरेक्टर वृषाली हरिहर यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील एचजेसी चीफ फौंडेशन व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यातर्फे आयोजित आंतरशालेय कथाकथन स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सिद्धू वडराळे होते.
स्मिता देसाई यांनी स्वागत करुन प्रस्ताविकात स्पर्धा आयोजनाचा उद्देश सांगितला. मन्यावरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उदघाटन झाले. विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास व्हावा तसेच दैनंदिन जीवनात कलेचे महत्त्व समजावे, या उद्देशाने ‘कला व तिचे दैनंदिन जीवनातील महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वृषाली हरिहर यांनी चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, हस्तकला, साहित्य आणि विविध सर्जनशील कलाप्रकारांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट केला. सिद्धू वडराळे यांनी विविध स्पर्धा व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव देण्याचे आवाहन केले. विविध शाळांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी आवाज, हावभाव, संवादफेक आणि प्रसंगानुरूप अभिनयाच्या माध्यमातून कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश, संस्कार, पर्यावरण, देशप्रेम, नैतिक मूल्ये आणि प्रेरणादायी प्रसंगांवर आधारित कथा सादर केल्या.
विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले . यावेळी मुख्याध्यापक एस.एस. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मनोज निकाडे, अप्पासाहेब पाटील, शिवाजी चौगुले, आनंदा ढगे, सीताराम चौगुले, राधिका शिंदे, अभिजित पाटील, विलास पाटील, युवराज यादव, रामदास कमते, अप्पासाहेब लोकरे, लक्ष्मण यादव, एस डी वडराळे, नामदेव पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए.चौगुले यांनी आभार मानले.


Belgaum Varta Belgaum Varta