

‘जनसेवेसाठी विशिष्ट पदाची गरज नाही’; विरोधकांकडून राजकीय फायद्यासाठी मुद्द्याचे भांडवल
बंगळूर : राज्यातील एकच उपमुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेला सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पूर्णविराम दिला आहे. जनतेमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठीच एकच उपमुख्यमंत्री ठेवण्यात आला असून, आता या विषयावर चर्चा करणे निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या चर्चेबाबत बोलताना जारकीहोळी यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. विरोधकांना राजीनामा मागण्याचा अधिकार आहे; मात्र तो स्वीकारायचा की नाकारायचा, हा अधिकार सरकारकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर पक्ष आणि सरकार योग्य उत्तर देईल, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुका जवळ आल्याने विरोधक छोट्या-छोट्या मुद्द्यांचे मोठे भांडवल करून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे वाद निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे जारकीहोळी म्हणाले.
चार उपमुख्यमंत्र्यांची मागणीही झाली होती
एकाच उपमुख्यमंत्र्याच्या पदाबाबत जारकीहोळी म्हणाले की, सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळातही एकच उपमुख्यमंत्री होता. त्यावेळी चार उपमुख्यमंत्री करण्याची मागणी झाली होती; मात्र सरकारने एकाच उपमुख्यमंत्र्याची व्यवस्था कायम ठेवली. सध्या देखील हीच व्यवस्था सुरू आहे.
‘जनतेची सेवा करण्यासाठी एखाद्या विशिष्ट पदाची गरज नाही. मंत्री म्हणूनही प्रभावीपणे काम करता येते,’ असे सांगत सतीश जारकीहोळी यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.


Belgaum Varta Belgaum Varta