
कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण; खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला
बेळगाव : “जरा जपून जपून जा रे… पुढे खड्डा आहे!” असा इशारा देत वाहन चालविण्याची वेळ सध्या बेळगावकरांवर आली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी आणि त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांचीही रोजचीच ‘कसरत’ सुरू आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था ही नवीन बाब राहिलेली नाही. दरवर्षी पावसाळा आला की रस्त्यांची अशीच अवस्था होते आणि नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडतो. मात्र, तक्रारी संपतात, पावसाळे जातात; खड्डे मात्र कायम राहतात! यंदाही परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नसून अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत.
पाण्याखाली लपलेले ‘मृत्यूचे सापळे’
राकसकोप बस थांबा ते रहदारी पोलीस स्थानकाकडे जाणारा मार्ग, राकसकोप बस थांबा ते शौर्य चौक मार्ग यासह परिसरातील विविध अंतर्गत रस्त्यांवर दिवसभर मोठी वर्दळ असते. दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, याच रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
अनेक खड्डे तब्बल पाच ते सात इंच खोल झाले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचल्याने खड्ड्यांची खोलीच लक्षात येत नाही. परिणामी, अचानक वाहन खड्ड्यात आदळल्याने दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांना अचानक वळावे लागत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याचीही शक्यता आहे.
खड्डे चुकविताना अपघाताला निमंत्रण!
रस्त्यावर एक-दोन नव्हे, तर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नेमका कोणता खड्डा चुकवायचा आणि कोणता स्वीकारायचा, असा प्रश्न वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांचा जीव धोक्यात येत असून, एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसात परिस्थिती अधिक गंभीर बनते. रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्याने त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे अक्षरशः मृत्यूचे सापळे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दुर्लक्ष; नागरिकांचा संताप
रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून रस्त्यांची नियमित पाहणी आणि देखभाल केली जात नसल्याने समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने कायमस्वरूपी डांबरीकरण करणे शक्य नसल्यास किमान खड्डे खडी-मुरूमाने बुजवून तात्पुरती डागडुजी तरी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडेही दुर्लक्ष सुरू राहिल्यास प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आणखी किती अपघातांची प्रतीक्षा केली जाणार? असा सवाल करत कॅन्टोन्मेंट बोर्डाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत आणि रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta