
पाच वर्षांनंतर यंदा ‘भद्रामुक्त’ योग; चंद्रग्रहणाचाही परिणाम नाही
निपाणी (वार्ता) : बहीण-भावाच्या अतूट नात्याचा आणि प्रेमाचा रक्षाबंधन सण रक्षाबंधन यंदा नेमका २७ की २८ ऑगस्टला साजरा करायचा यावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पंचांगानुसार २७ तारखेला सकाळी ९:०९ वाजता पौर्णिमा सुरू होत असली तरी रात्री ९:३३ पर्यंत भद्रा काळ आहे. या वेळेत राखी बांधणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीनुसार ‘उदया तिथी’ मानून शुक्रवारी (ता. २८) रक्षाबंधन साजरे करणे शुभ राहील, असा सल्ला पौरोहित्यांनी दिला आहे.
सलग पाच वर्षांनंतर यंदा २८ तारखेला पूर्णपणे ‘भद्रामुक्त’ असा शुभ योग जुळून आला आहे. यापूर्वी २०२० मध्ये असा योग आला होता. त्यानंतर २०२१ ते २०२५ या पाचही वर्षांत रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रेचे सावट होते. दरम्यान२७ तारखेला दिवसभरात कुलधर्म-कुलाचार आणि सत्यनारायण आदु धार्मिक पूजा करता येणार आहेत. २८ तारखेला पडणाऱ्या चंद्रग्रहणाबाबतही नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, २८ तारखेचे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा कोणताही वेध किंवा नियम पाळण्याची गरज नाही. २७ तारखेला बहिणींनी केवळ सत्यनारायण पूजन, पौर्णिमा व्रत व उपवास करावा. २८ तारखेला सूर्योदयापासून तीन तासांपर्यंत पौर्णिमा तिथी लाभत असल्याने संपूर्ण दिवस ‘उदया तिथी’ मानून निःसंकोचपणे हा सण साजरा करावा, असा सल्ला पुरोहितांनी दिला आहे.
——————————————————————
‘२८ तारखेला उदया तिथी लाभत असल्याने सकाळी ६:२५ पासून दिवसभरात राखी बांधण्यासाठी पंचांगानुसार पाच मुहूर्त आहेत. शुभ मुहूर्तावर रक्षाबंधन करणे शास्त्रसंमत आणि शुभ ठरेल. चंद्रग्रहणाचा कोणताही वेध पाळण्याची गरज नाही.
-शरद जोशी, पुरोहित

Belgaum Varta Belgaum Varta