
बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या बदलीवरून सुरू असलेल्या चर्चेला आता राजकीय रंग आला आहे. पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याशी चर्चा करून माहिती घेणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, शहर पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारून अद्याप केवळ १२ ते १३ महिने झाले आहेत. त्यामुळे किमान विधानमंडळाचे अधिवेशन होईपर्यंत विद्यमान आयुक्तांना पदावर कायम ठेवावे, अशी मागणी पुढे आली आहे.
अधिकाऱ्यांच्या बदली आणि नियुक्तीबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले जाते का, असा प्रश्न विचारला असता जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांच्या बदली व नियुक्तीचा अंतिम निर्णय सरकारचा असतो, असे सांगितले.
बेळगाव जिल्ह्याशी संबंधित या विषयावर चर्चा झाली असून, अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे. पोलीस आयुक्तांच्या बदलीची प्रक्रिया आपल्या निदर्शनास न आणता झाली आहे का, याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Belgaum Varta Belgaum Varta