
निपाणी (वार्ता) : बोरगाव-घोसरवाड सीमाभागातील दूधगंगा नदीवर असलेले जुने धरण नादुरुस्त झाल्याने त्याचा फटका बोरगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना बसत आहे. पावसाळ्यासह उन्हाळ्यात काळम्मावाडी धरणातून नदीला सोडण्यात येणारे पाणी बोरगाव परिसरात पुरेशा प्रमाणात साठून न राहता महाराष्ट्रातील घोसरवाडच्या दिशेने वाहून जाते. परिणामी काही दिवसांतच नदीपात्र कोरडे पडून शेतीसह बोरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर दूधगंगा नदीवरील जुना नादुरुस्त बंधारा तातडीने दुरुस्त करावा किंवा त्याच ठिकाणी नव्याने सक्षम बंधारा प्रकल्प उभारावा, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शेतकरी नेते सुनील नांगरे-पाटील म्हणाले, दूधगंगा नदीवरील हा बंधारा जुना असून गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. बंधारा नादुरुस्त असल्याने कर्नाटक हद्दीतून येणारे पाणी बोरगाव परिसरात अपेक्षित प्रमाणात अडविले जात नाही. त्यामुळे विशेषतः उन्हाळ्यात बोरगाव शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकांनाही पाण्याअभावी अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संबंधित कामाच्या मंजुरीची व सद्यस्थितीची माहिती घेण्याचे आश्वासन दिले.
मंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बंधाऱ्याचे काम मार्गी लागल्यास दूधगंगा नदीतील पाणीसाठा टिकून राहून बोरगाव शहरासह परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी आधार मिळेल आणि शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब बसन्नवर, तालुका रयत संघटना उपाध्यक्ष बाहुबली हवले, रमेश मालगावे, भरत हवले, अभिषेक पाटील, शितल सोबाने, अभिनंदन फिरगन्नवर, शितल सातपुते, अमित माळी, चंदू पवार, पिंटू चौगुले, उदय पवार यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta