Tuesday , September 1 2026
Breaking News

तळागाळातील समाजसेवेसाठी सेवाभावी संस्थांची भूमिका महत्त्वाची : ॲडमिरल रघुवीर पुरंदरे

Spread the love

 

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व अधिकारग्रहण सोहळा उत्साहात

बेळगाव : देश विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि विविध क्षेत्रांत झपाट्याने प्रगती करत असला, तरी विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सेवाभावी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाजातील गरजू, निराधार, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा ओळखून सातत्याने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ॲडमिरल रघुवीर पुरंदरे यांनी केले.

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामच्या उद्घाटनासह नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व अधिकारग्रहण सोहळा हॉटेल सीरॉक, कॉलेज रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमास अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बालाजी शास्त्री, उपप्रांतपाल ॲड. धन्यकुमार पाटील, ॲड. दिनकर शेट्टी, रमेश हेडगे तसेच इन्स्टॉलेशन अधिकारी डॉ. नवीना शेट्टीगार यांची प्रमुख उपस्थिती होती.

विश्वशांतीसाठी सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ हे प्रेरणादायी गीत व अलायन्स प्रार्थना सादर करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्लबचे उद्घाटन करण्यात आले.

मदन बामणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविकातून अलायन्स क्लबच्या स्थापनेमागील उद्देश, सामाजिक बांधिलकी आणि सेवाकार्याची भूमिका स्पष्ट केली.

इन्स्टॉलेशन अधिकारी डॉ. नवीना शेट्टीगार यांनी नूतन सदस्यांना शपथ दिली. त्यानंतर सदस्यांना अलायन्सचे पिन व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नूतन पदाधिकाऱ्यांचाही शपथविधी यावेळी पार पडला.

राजश्री हसबे यांनी अध्यक्षा म्हणून, पुरुषोत्तम हसबे यांनी सचिव म्हणून, जीवन कदम यांनी खजिनदार म्हणून, तर सुरेखा पाटील व दीपाली देसाई यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

अध्यक्षा राजश्री हसबे यांनी मनोगतात क्लबच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक सेवा, गरजू व्यक्तींना मदत आणि सामाजिक जनजागृतीच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

ॲडमिरल रघुवीर पुरंदरे यांनी समाजसेवेत शिस्त, नियोजन आणि सातत्य या त्रिसूत्रीचे महत्त्व अधोरेखित केले. सेवा ही केवळ एखाद्या उपक्रमापुरती मर्यादित न राहता जीवनमूल्य बनली पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी पदाला केवळ प्रतिष्ठेचे स्थान न मानता समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून त्याकडे पाहावे आणि सेवाकार्य तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बालाजी शास्त्री यांनी अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या कार्याची माहिती देताना मैत्री, सेवा आणि एकता या मूल्यांवर संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारातून संस्थेचे कार्य सुरू असून, २२ देशांमध्ये २० हजारांहून अधिक सदस्यांच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शरद पाटील, मनोहर कालकुंद्रीकर, नीलम कदम, विद्या सरनोबत, संजय पाटील, मानसी चौगुले, विजय निंबाळकर, मिलिंद सुळगेकर, राम गुरव, मधुरा गुरव, स्नेहलता चौगुले, रेखा बामणे, ज्योती गवी, चंद्रा चोपडे यांच्यासह अनेक मान्यवर व सदस्य उपस्थित होते.

श्रुती हंगीरगेकर यांनी सूत्रसंचालन केले. पुरुषोत्तम हसबे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि गरजूंच्या मदतीसाठी वर्षभर विविध लोकहितकारी उपक्रम राबविण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

सर्वर डाऊन अन् वीज खंडितमुळे रेशन वितरण रखडले; जिल्ह्यात लाखो नागरिक धान्यापासून वंचित

Spread the love  बेळगाव : रेशन वितरण प्रक्रियेमध्ये सर्वर डाऊनची समस्या जैसे थे असून, परिणामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *