
धारवाड : चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे धारवाड तालुक्यातील वेंकटपूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडला.
मृतांची नावे दावणगेरे जिल्ह्यातील केरेयागळ गावातील विनायक (२५), मंजुनाथ (२९) आणि बसवराज (३४) अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण बेळगावहून धारवाडच्या दिशेने कारमधून प्रवास करत होते. बेळगावजवळील मुल्ला धाब्यावर जेवण केल्यानंतर धारवाडकडे परतत असताना वेंकटपूरजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत अभिषेक, अजय आणि बसनगौडा हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच गरग पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta