
बेळगाव : रेशन वितरण प्रक्रियेमध्ये सर्वर डाऊनची समस्या जैसे थे असून, परिणामी जिल्ह्यात अद्यापही केवळ ८४.३६ टक्केच रेशन धान्याचे वितरण झाले आहे. ऑगस्ट महिना संपला तरीही मागील महिन्याचे रेशन वितरण सुरूच असून, जिल्ह्याभरातील तब्बल १ लाख ७७ हजार ७८० रेशनकार्ड धारक अद्यापही धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा खात्याने सर्व दुकानदारांना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बायोमेट्रिक पडताळणीद्वारे धान्य वाटप सुरू ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
तांत्रिक अडचणींचा विळखा
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण ११ लाख ३४ हजार ५६३ रेशनकार्ड धारक आहेत. सरकारच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या अखेरपर्यंत बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून धान्य वितरण करणे बंधनकारक आहे. मात्र, वारंवार कोलमडणारी सर्व्हर यंत्रणा आणि ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे वितरणाला मोठा विलंब होत आहे. वीजेच्या समस्येवर मात करण्यासाठी दुकानदारांना तातडीने यूपीएस बॅटरी (UPS Battery) बसवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
बेळगाव तालुका अव्वल स्थानी
जिल्ह्यात एकूण १,८७४ रेशन दुकाने कार्यरत आहेत. या संपूर्ण वितरण प्रक्रियेत बेळगाव तालुका सध्या अव्वल स्थानी राहिला असून इतर तालुक्यांच्या तुलनेत येथे चांगली कामगिरी झाली आहे. असे असले तरी अजूनही १७ लाखांहून अधिक नागरिक धान्यापासून वंचित असल्याने बायोमेट्रिक नोंदणी व वितरणाचा कालावधी वाढवून देण्याची तीव्र मागणी नागरिक व दुकानदारांमधून होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta