
वडगाव : जुने बेळगाव व वडगाव परिसरातील हजारो जनावरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चावडीच्या जागेत सुरू असलेला जनावरांचा दवाखाना सध्या स्टाफअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे.
या परिसरात बैल, गाई, म्हशी, शेळ्या यांसह कुत्री व मांजर पाळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय उपचारांसाठी हा दवाखाना परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरत होता. यापूर्वी येथे मुख्य पशुवैद्यकीय डॉक्टरांसह दोन प्रशिक्षित मदतनीस कार्यरत होते. मात्र, आधीच्या डॉक्टरांची बदली झाल्यानंतर नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात दवाखान्यात गेल्यावर कुलूप पाहायला मिळत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.
दवाखाना बंद असल्याने जनावरांना तातडीने उपचार मिळत नसून, पशुपालकांना दूरवरच्या दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे संबंधित पशुसंवर्धन विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वडगाव येथील दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय डॉक्टर तसेच प्रशिक्षित मदतनीसांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी व पशुपालकांतून होत आहे.
दवाखाना त्वरित सुरू न केल्यास येत्या काही दिवसांत शेतकरी संबंधित खात्यावर धडक देऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta