
कर्नाटक-महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : मातंग समाजासह तळागाळातील बहुजन समाजातील गरीब, वंचित जनतेसाठी अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. स्वतः कमी शिक्षित असूनही लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना समाजाने मानसिक गुलामगिरीच्या चौकटीतून बाहेर पडण्याची गरज आहे. समाजातील लहान-सहान कामांमध्येच आयुष्य न घालवता शिक्षण, कौशल्य आणि संधीच्या माध्यमातून आपले भविष्य घडवावे. मुलांना मोठे करण्याचे स्वप्न प्रत्येक पालकाने पाहावे, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले त्यांनी केले.
बोरगाव येथे सुनिता ऐवाळे, निकिता हेगडे यांच्या नेतृत्वाखाली व भूपाल हिरेमनी यांच्या पुढाकाराने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. (३१ ) आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, उपाध्यक्ष रोहन साळवे, अण्णासाहेब हवले, राजेंद्र वडर, सुप्रिया पाटील, इचलकरंजी महानगरपालिकेचे सभापती रुबन आवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आजही अनेक कुटुंबे घर-जागेपासून वंचित आहेत. अशा गरजू नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जागा व घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या कामाचा शुभारंभ बोरगावपासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार राजीव आवळे यांनी, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे प्रबोधन करताना राज्य सरकारने बहुजन समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन समाजाच्या प्रगतीला गती देण्याचे आवाहन केले. काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. अण्णासाहेब हवले, सुनिता ऐवाळे, रुबन आवळे, सुप्रिया पाटील, रमेश मालगार यांनीही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज व जगतज्योती बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचा जागर करत बहुजन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, महावीर ऐवाळे, सुरेश ऐवाळे, निकिता हेगडे, भूपाल हिरेमनी, प्रवीण हेगडे, सुभाष ऐवाळे यांच्यासह निपाणीसह परिसरातील बहुजन समाजाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta