
शिवालयात दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी
निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्या निमित्त गेल्या दोनही सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील शिवालये भाविकांनी फुलून गेली होती. तिसऱ्या सोमवारीही (ता.३१) दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमासह ‘बम बम बोले’ चा गजर सुरू होता.
येथील महादेव गल्लीतील प्राचीन महादेव मंदिरात पहाटे भाविकांच्या हस्ते पूजा व अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर जपनाम कार्यक्रम झाला. सामूहिक आरती झाल्यावर शाबू खिचडीचे वाटप करण्यात आले.
मंदिराच्या बाहेर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट केली आहे.
रात्री महादेव पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
तिसऱ्या सोमवारची पूजा प्रशांत साजनावर, नितीन गुरव, यांनी आकर्षक अशी बांधली होती. तर प्रसाद कोठीवाले, पवन शेट्टी आणि लहू शेटके यांच्यातर्फे भाविकांना शाबूच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.
यावेळी महादेव मंदिर ट्रस्ट कमिटी पदाधिकारी, निलंबिका महिला मंडळाच्या सदस्या, गणेश मंडळ, एस. पी. ग्रुप, महादेव पालखी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवार पेठेतील महादेव मंदिर, शिप्पूर रामलिंग मंदिरासह विविध ठिकाणी श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

Belgaum Varta Belgaum Varta