
निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरातील साखर कारखान्यांच्या उच्च क्षमतेमुळे वाढलेल्या ऊसाच्या पिकावर आता पांढऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस पिकाची वाढ खुंटत असून पानेही पिवळी पडत आहेत. परिणामी उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थीक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परिसरात असलेल्या साखर कारखान्यांच्या व कृषी विभागाने वेळीच लक्ष दिले नाही तर परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची चिन्ह आहेत. ऊसाला पंपाने फवारणी करणे शक्य नसल्यामुळे कारखान्यांनी व कृषी विभागांनी पुरेसे ड्रोन फवारणी यंत्रे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. नद्यामुळे पाण्याची उपलब्धता व अलिकडच्या काळात ऊसाला मिळत असलेला समाधानकारक दरामुळे ऊसाची लागवड वाढली आहे. हवामानातील बदलाचा फटकाआता या पिकाला बसत असल्याचे दिसून आले असून फवारणीसाठी ड्रोन यंत्र हाच पर्याय उरला असला तरी तशी फवारणी करण्याची व्यापक यंत्रणा कोणत्याच कारखान्याकडे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची हतबलता दिसून येत आहे. यावर कृषी विभागाने तातडीने पाऊले उचलून फवारणीसाठी ड्रोन यंत्रे कशी उपलब्ध होतील, याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta