
बेळगाव : सोनं, जमीन किंवा महिलांच्या कारणावरून झालेल्या वादातून खून झाल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र, बेळगाव जिल्ह्यात चिकनचा तुकडा जास्त खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट खुनात संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुडलगी तालुक्यातील हुन्नशाळ पी.जी. गावात २३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील कबीरगंज येथील सीताराम चंद्रदेव (३०) याचा या घटनेत मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्यासोबत काम करणाऱ्या अरुणकुमार बलिष्टर चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.
दोघेही हुन्नशाळ पी.जी. येथील प्रिया स्टील्स कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते. कारखान्याच्या परिसरातील शेडमध्ये अन्य चार-पाच कामगारांसह ते राहत होते. २३ ऑगस्टच्या रात्री त्यांनी चिकन शिजवून मद्यपान केले. जेवण झाल्यानंतर इतर कामगार झोपण्यासाठी गेले. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या अरुणकुमार आणि सीताराम यांच्यात चिकन खाण्यावरून वाद सुरू झाला.
‘तू माझ्यापेक्षा जास्त चिकन खात आहेस’ असे म्हणत अरुणकुमारने वाद घातला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या अरुणकुमारने स्वयंपाकासाठी वापरला जाणारा चाकू हातात घेऊन सीतारामच्या छातीवर जोरदार वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सीतारामचा अतिरक्तस्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मुडलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अरुणकुमारला अटक करून पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta