
गुंजी : लोंढा बस स्थानकात परिवहन खात्याच्या सर्व बसेस येत नसल्याची तक्रार अनेक दिवसापासून होती. मोजक्याच बसेस बस स्थानकात येऊन जात होत्या अनेक बसेस लोंढा क्रॉस वरूनच जात असल्याने लोंढा बस स्थानकात बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागत होता. लोंढा हे रेल्वे जंक्शन स्टेशन असून बाजारपेठेचे मोठे गाव आहे. या गावाच्या आजूबाजूला अनेक खेडी आहेत. त्यामुळे येथील बस स्थानकात अनेक प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे महामार्गावरून बेळगाव गोवाकडे जाणाऱ्या सर्व परिवहन खात्याच्या बस येणे गरजेचे आहे मात्र सर्व बसेस येत नसल्याने येथील नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पंच हमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्याकडे आली होती.
सदर तक्रारीची दखल घेऊन त्यांनी सरकारकडे सतत पाठपुरवठा व प्रयत्न सुरू ठेवले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लोंढा बस स्थानकात बस नियंत्रकाची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे आता परिवहन खात्याच्या सर्व बसना लोंढा स्थानकात येऊन नोंद करणे अनिवार्य झाल्याने यापूर्वी या स्थानकात न येणाऱ्या रामनगर- पणजी, बेळगाव- पणजी, बागलकोट वास्को, इलकल, तालिकोट, इंडी, बेळगाव- वास्को, गोकाक पणजी आणि बेळगाव कारवार आदी सर्व बस ज्या यापूर्वी लोंढा क्रॉस वर न येता पुढे जात होत्या. त्या सर्व बस आता पुढील दिवसापासून लोंढा बस स्थानकात येणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली आहे. त्याचबरोबर अनेक जलद बसही गुंजी बस स्थानकावर थांबवण्याची विनंती सदर बस नियंत्रकाकडे केली असून याचा फायदा गुंजी सह परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे लोंढ्यासह गुंजी परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta