
चंद्रशेखर गायकवाड यांच्या सामाजिक, उपरोधिक आणि भावस्पर्शी कवितांना उत्स्फूर्त दाद
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ कवी चंद्रशेखर गायकवाड यांच्या ‘कळा या लागल्या जीवा’ या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि उपस्थितांचे खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, कवी-कवयित्री आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे सचिव सुधाकर गावडे होते. प्रारंभी त्यांनी प्रास्ताविक करून कवी चंद्रशेखर गायकवाड यांचा सन्मान केला. व्यासपीठावर कवी गुरुनाथ किरमटे उपस्थित होते.
त्यानंतर ज्येष्ठ कवी चंद्रशेखर गायकवाड यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ‘सार्थक’, ‘अशोकचक’, ‘काळची गरज’, ‘अळीचा अभद्र अजगर’, ‘फिरुनी नवी जन्मेन मी’, ‘ही रात्र मंतरलेली’, ‘नाते तुझे माझे’ आणि ‘भैरवी’ या कविता सादर केल्या.
‘सार्थक’ या कवितेतून जन्म, जगणे आणि मृत्यूकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन त्यांनी मांडला. “लागला म्हणून घ्यावा / घेऊन जन्म गेलो…” या ओळींतून मानवी जीवनाच्या सार्थकतेचा शोध घेताना जीवनातील नश्वरतेचे भान व्यक्त केले. ‘अशोकचक’ या कवितेतून समकालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीवर उपरोधिक आणि बोचऱ्या शैलीत भाष्य केले. “सिंहासन पोखरलेल्या / झुरळावरती झाडल्या गोळ्या…” या ओळींतून सत्तेतील विसंगती आणि सामाजिक वास्तवावर त्यांनी प्रहार केला.
शिक्षणव्यवस्थेतील बदल आणि मातृभाषेपासून दुरावणाऱ्या नव्या पिढीची चिंता ‘काळची गरज’ या कवितेतून व्यक्त झाली. “इंग्लिश मीडियमच्या मागे / मराठीला सोडून गेलो…” या आशयातून मराठी भाषा, खेळ आणि बालपणापासून दूर जाणाऱ्या मुलांचे वास्तव त्यांनी मांडले.

‘अळीचा अभद्र अजगर’ या कवितेतून मनातील पूर्वग्रह, द्वेष आणि संशयाच्या वृत्तीवर भाष्य करताना “शबरीच्या बोरात देखील / तक्षक तुला दिसला आहे” या प्रभावी प्रतिमेतून विकृत दृष्टिकोनाचे चित्रण केले. ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ मधून संघर्षानंतर पुन्हा उभे राहण्याची आशावादी भावना, तर ‘ही रात्र मंतरलेली’ मधून प्रेम आणि भावविश्वातील तरलता व्यक्त झाली. ‘नाते तुझे माझे’ मधून मानवी नात्यांतील जिव्हाळा आणि भावबंध उलगडले, तर ‘भैरवी’ने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली.
गायकवाड यांच्या काव्यवाचनाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक वास्तवावर मार्मिक भाष्य, उपरोधाची धार, मानवी नात्यांची हळुवार जाणीव आणि जीवनाकडे पाहण्याची चिंतनशील दृष्टी. त्यांच्या कवितांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
यानिमित्ताने झालेल्या खुल्या कवी संमेलनात प्रा. शुभदा खानोलकर, अपर्णा पाटील, प्रा. मनीषा नाडगौडा, रोशनी हूंदरे, नेहा जोशी, भरत गावडे, सीमा कनबरकर, नंदिनी दामले, अशोक सुतार, स्मिता किल्लेकर, गुरुनाथ किरमटे, जितेंद्र रेडेकर, प्रा. स्वरूपा इनामदार, प्रकाश अनवेकर, किरण पाटील, दत्ता घोडके, प्रकाश पाटील, कृष्णा पारवाडकर, सुधाकर गावडे, बसवंत शहापूरकर, मनोहर घडी आदी कवींनी विविध विषयांवरील स्वरचित कविता सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र रेडेकर यांनी केले, तर आभार नेहा जोशी यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta