
निपाणी (वार्ता) : आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात इंग्लिश मिडीयम शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहात भारतीय संस्कृती, परंपरा, सण-उत्सव आणि संस्कार कुठेतरी मागे पडू नयेत, याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कृतीची ओळख करून देत पारंपारिक पद्धतीने रक्षाबंधन सन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हातातल्या रंगीबेरंगी राख्या आणि भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम यामुळे शाळेचे वातावरण प्रेमाच्या आणि आपुलकीच्या रंगाने न्हाऊन निघाले होते. राखी पौर्णिमा म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर तो भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या एका छोट्याशा राखीच्या धाग्यामध्ये अनेक आठवणी, बालपण, प्रेम, काळजी आणि आयुष्यभराची आपुलकी गुंफलेली असते. बहिणीच्या हातून भावाच्या मनगटावर बांधली जाणारी राखी ही त्यांच्या नात्यातील प्रेमाची सुंदर आठवण करून दिली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या सणांचे आणि परंपरांचे महत्त्व समजावे, आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण व्हावा आणि नात्यांमधील प्रेम व आपुलकीची भावना अधिक दृढ व्हावी, हा सुंदर संदेश देण्यात आला.
प्राचार्या चेतना चौगुले यांनी, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान देणे हा शिक्षणाचा उद्देश नसून, त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, चांगले संस्कार देणे आणि समाजात एक जबाबदार व संवेदनशील व्यक्ती म्हणून घडवणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांनी, अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती आणि परंपरांना दिले जाणारे महत्त्व निश्चितच कौतुकास्पद आहे. विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे आणि ही गरज अंकुरम स्कूल सुंदर पद्धतीने पूर्ण करत असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta