
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय व पुणे येथील क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने सायबर सुरक्षा बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देवचंद महाविद्यालयाचे वॉरियर्स पल्लवी पाटील व पल्लवी सतीश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डिजिटल युगात इंटरनेट, मोबाईल आणि ऑनलाइन व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढत असून त्यापासून सावधान राहण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विनायक बाचणे होते.
नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. ओटीपी, पिन पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन केले. सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मजबूत पासवर्ड वापरणे, दोन-स्तरीय सुरक्षा सुरू ठेवणे आणि सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
विज्ञान शिक्षक एस. बी. पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विनायक बाचणे यांनी, सावध रहा, सुरक्षित रहा आणि सायबर गुन्ह्यांना आळा घाला” हा संदेश देत शाळा व नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी यू. आर. पवार यांनी सायबर गुन्हे घडल्यास घाबरून न जाता पालक, शिक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांची मदत घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही “सुरक्षित इंटरनेट वापरू, सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करू” असा संकल्प केला. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta