Thursday , August 27 2026
Breaking News

आमदार आसिफ सेठ यांनी स्वीकारला बुडा अध्यक्षपदाचा पदभार

Spread the love

 

कणबर्गी लेआउटच्या विकासासह आयटी पार्क उभारणीचा निर्धार

बेळगाव : बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) नूतन अध्यक्षपदी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. रखडलेल्या कणबर्गी वसाहत लेआउटच्या विकासासह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आसिफ सेठ म्हणाले की, कणबर्गी लेआउटच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. तसेच बेळगावमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहरात वाढत असलेल्या अनधिकृत लेआउटविरोधातही आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत लेआउटवर कारवाई

कायद्याचे उल्लंघन करून उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत लेआउटविरोधात सार्वजनिक हित लक्षात घेऊन कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे सेठ यांनी सांगितले.

दरम्यान, अल्पसंख्याक कोट्यातून मंत्रिपद मिळावे, अशी आपलीही अपेक्षा होती. मात्र, आता बुडा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली असून त्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो, असेही त्यांनी नमूद केले.

बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहनही आसिफ सेठ यांनी केले.

यावेळी माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बुडाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार फिरोज सेठ, बुडा आयुक्त यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

उद्योजकता आणि सामाजिक नेतृत्वाचा गौरव

Spread the love  बेळगाव : २७ ऑगस्ट २०२६ रोजी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणला BNI …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *