
बेंगळूरमधील १० क्लबवर अन्नसुरक्षा विभागाची धडक कारवाई; अस्वच्छ स्वयंपाकघरे, धुरळ्याचा वावर उघड
बेळगाव : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्नसुरक्षा व औषध नियंत्रण विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलनंतर आता क्लबकडेही विभागाने मोर्चा वळविला असून, ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील तब्बल १० क्लबवर छापे टाकून तपासणी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान अनेक क्लबमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. काही ठिकाणी मुदत संपलेले कडधान्य व इतर खाद्यपदार्थ, तर काही ठिकाणी अस्वच्छ स्वयंपाकघरे आणि धुरळ्याचा वावर आढळून आला. खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचेही तपासणी पथकाच्या निदर्शनास आले.
अधिकाऱ्यांनी क्लबमधील स्वयंपाकघर, खाद्यपदार्थांची साठवणूक करण्याची ठिकाणे, स्वयंपाकाची पद्धत तसेच स्वच्छतेच्या उपाययोजनांची बारकाईने तपासणी केली. यावेळी अनेक खाद्यपदार्थांवर मुदत समाप्तीची तारीख, कमाल किरकोळ विक्री किंमत (एमआरपी) तसेच आवश्यक लेबलिंगची माहिती नसल्याचे आढळून आले.
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित क्लब व्यवस्थापनाला विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आढळून आलेल्या त्रुटी तातडीने दूर करून निर्धारित अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा देत अन्नसुरक्षा व औषध नियंत्रण विभागाने तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हॉटेल, कॅन्टीन, रेस्टॉरंट आणि विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर सातत्याने धाडी टाकून अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेची तपासणी केली जात आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta