Thursday , August 27 2026
Breaking News

न्यू गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणारा आणि डेक्कन हॉस्पिटलसमोरील अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘न्यू गुड्स शेड रोड’ गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य गटारींचे बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी आज बेळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांना जाहीर निवेदन देण्यात आले.
यावेळी रमाकांत कोंडुस्कर, विकास कलघटगी, गणेश दड्डीकर, प्राचार्य आनंद आपटेकर, विशाल देशपांडे, प्रसाद मरगाळे, राजू बेर्जे, संजय शिंदे, विनायक गुंजटकर, सुनील बोकडे, संकेत पेडणेकर, डेक्कन हॉस्पिटलचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाच्या दिरंगाईवर नागरिकांचा तीव्र संताप
नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, यापूर्वी १० जून २०२६ रोजी आणि त्यानंतर ३ जुलै २०२६ रोजी स्मरणपत्र देऊनही महापालिका प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. इतकेच नव्हे तर, १४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी आणि १८ ऑगस्ट २०२६ रोजी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनाही याबाबत साकडे घालण्यात आले होते. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश देऊनही महापालिका प्रशासन ढिम्म राहिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जेसीबीने केवळ मलमपट्टी; रस्ता बनला मृत्यूचा सापळा
महापालिकेने काही दिवसांपूर्वी केवळ जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खरवडून आणि सपाटीकरण करून तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र, यामुळे हा रस्ता पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनला असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. पावसाळा संपून हवामान अनुकूल झाले असतानाही प्रशासन कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शाळकरी मुले आणि रुग्णांचे हाल
हा रस्ता परिसरातील शाळा, महाविद्यालये, डेक्कन हॉस्पिटल तसेच रेल्वे स्थानकासाठी एकमेव मुख्य संपर्क मार्ग आहे. खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांची मोठी कोंडी होत आहे. ‘आता प्रशासनाला आणखी किती अपघातांची प्रतीक्षा आहे?’ असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
“बेळगावच्या जनतेला पोकळ आश्वासने नको, तर सुरक्षित रस्ते हवेत,” अशा शब्दांत नागरिकांनी प्रशासनाला सुनावले असून, यावेळेस त्वरित डांबरीकरण आणि पाणी उपशाची योग्य व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित नागरिकांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

सोशल मीडियावरील हनी ट्रॅपपासून सावध; पोलिसांचा नागरिकांना इशारा

Spread the love  अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन मैत्री महागात; फोटो-व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *