Friday , August 28 2026
Breaking News

बेळगावात ३५० विद्यार्थ्यांनी बांधल्या १००० हून अधिक राख्या

Spread the love

 

बेळगाव : रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता कृतज्ञता, मानवता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेच्या कॅम्प बेळगाव येथील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी १००० हून अधिक राख्या बांधल्या.

कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कॅम्प पोलीस ठाणे, कॅम्प वाहतूक पोलीस ठाणे, अग्निशमन दल, एसडीआरपी कार्यालय, भारतीय सैन्यदलातील जवान तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांच्या सेवेला सलाम केला.
यावेळी समृद्ध फाउंडेशन फॉर डिसेबल्ड येथील विशेष मुलांनाही शाळेत आमंत्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रेमाने स्वागत करून गाणी व आरती सादर केली आणि राख्या बांधत मैत्री व माणुसकीला कोणत्याही सीमा नसतात, हा हृदयस्पर्शी संदेश दिला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी लेले मैदानावर सुरू असलेल्या हॉकी बेळगाव स्पर्धेला भेट देऊन शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या तसेच मिठाई व फळांचे वाटप केले.
या उपक्रमातून रक्षाबंधन म्हणजे केवळ कौटुंबिक नाते नव्हे, तर समाजाचे रक्षण करणाऱ्या, सेवा देणाऱ्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, असा प्रभावी संदेश देण्यात आला.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुदाम हरिविजय मांचलवार आणि मुख्याध्यापक श्री. प्रशांत बिरजे यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.
फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमचे संतोष आर. दरेकर, मधु आर. हाशिलकर, सचिन सुलेभावी, अमरनाथ सरदेसाई, रेखा नायडू, श्रीनाथ, जम्यांग वांग्याल आणि लक्ष्मी एस. सोराटूर यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले.

About Belgaum Varta

Check Also

कासम तळ्याच्या विकासासाठी देसूर काँग्रेस कमिटीचा पुढाकार

Spread the love  देसूर : देसूर येथील कासम तळ्याच्या परिसरात नागरिकांसाठी ट्रॅकिंग पॉईंट, चालण्याचा मार्ग, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *