Friday , August 28 2026
Breaking News

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभ्यासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती

Spread the love

 

परीक्षा, भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांसह शिक्षणातील सुधारणांबाबत महिनाभरात अहवाल

बंगळूर : विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच शिक्षण क्षेत्रातील आवश्यक सुधारणांचा व्यापक अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यू. टी. खादर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख प्रश्नांचा आढावा घेतला जाणार आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षांमधील गैरप्रकार आणि भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविणे, हे समितीच्या प्रमुख कार्यांपैकी एक आहे. परीक्षा आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता व निष्पक्षता वाढविण्यासाठी कोणत्या सुधारणा करता येतील, याबाबत समिती सरकारला शिफारशी करणार आहे.

अभ्यासक्रम आणि कौशल्य विकासाचाही आढावा

शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रमात आवश्यक बदल, रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि शिक्षणातून रोजगाराशी जोडणी या बाबींचाही समिती अभ्यास करणार आहे. तसेच शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही शिफारशी केल्या जाणार आहेत.

विविध घटकांशी संवाद

शिक्षण व्यवस्थेतील प्रत्यक्ष अडचणी जाणून घेण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाणार आहे. गरज भासल्यास संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनही घेतले जाणार आहे. या चर्चेतून मिळणाऱ्या सूचना आणि माहितीच्या आधारे शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी शिफारशी निश्चित केल्या जातील.

समितीने स्थापनेपासून एका महिन्याच्या आत सरकारला अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे समितीच्या अहवालातून शिक्षण क्षेत्रातील कोणत्या सुधारणा सुचवल्या जातात, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पदवीपूर्व विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेशाची ‘भेट’!

Spread the love  मोफत पाठ्यपुस्तकांनंतर गणवेश वाटपाचा सरकारचा विचार; शिक्षणाचा आर्थिक भार कमी करण्यावर भर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *