
बेंगळुरू : वाल्मीकी विकास महामंडळातील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्ली दौऱ्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली असून, येत्या एक-दोन दिवसांत नागेंद्र यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती, विरोधकांकडून सुरू असलेले आंदोलन आणि त्यामुळे सरकारची होत असलेली राजकीय कोंडी तसेच आगामी काळातील संभाव्य कायदेशीर अडचणी याबाबत हायकमांडने मुख्यमंत्री शिवकुमार यांच्याकडून माहिती घेतल्याचे समजते.
विशेष म्हणजे, नागेंद्र यांच्याविरोधातील तपास पुढे नेण्यासाठी सीबीआयने राज्यपालांची परवानगी मागितल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. राज्यपालांनी परवानगी दिल्यास सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपकडून सरकारविरोधात पदयात्रा काढून आंदोलन सुरू असल्याने विरोधकांच्या हातातील महत्त्वाचे राजकीय अस्त्र निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेसकडून ‘डॅमेज कंट्रोल’ची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे.
‘पक्षासाठी त्याग करण्यास नागेंद्र तयार’
‘व्यक्तीपेक्षा पक्ष आणि सरकार महत्त्वाचे’ या भूमिकेतून नागेंद्र यांना राजीनाम्याचा संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, हा राजीनामा दोष स्वीकारल्याप्रमाणे न भासवता पक्ष आणि सरकारची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी केलेला त्याग म्हणून मांडण्याची काँग्रेसची रणनीती असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीमध्ये बोलताना, ‘नागेंद्र पक्षासाठी कोणत्याही त्यागास तयार आहेत’, असे संकेत दिल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
दोन नव्या चेहऱ्यांना संधी?
नागेंद्र यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या मंत्रिपदासाठी अनुसूचित जमातीच्या कोट्यातून अन्नपूर्णा तुकाराम यांना संधी देण्याची चर्चा आहे. यामुळे बल्लारी जिल्ह्याचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व कायम राहण्याबरोबरच मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे समजते.
अन्नपूर्णा तुकाराम यांच्यासोबतच लक्ष्मी हेब्बाळकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उत्तर कर्नाटकातील कुरुब समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी बडगीचे बसवराज नीलप्पा शिवण्णवर यांना मंत्रिपद देण्याची माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सूचना विचारात न घेतल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
एकूणच, नागेंद्र यांच्या संभाव्य राजीनाम्यासोबतच कर्नाटक मंत्रिमंडळात लवकरच छोटा फेरबदल होण्याची शक्यता असून, दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta