
खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील रहिवासी मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्या दुहेरी हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी खानापुरात विविध हिंदू संघटनांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो नागरिक, महिला आणि युवक मोर्चात सहभागी झाले. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा द्यावी, तसेच केसरेकर कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चाच्या अग्रभागी दिवंगत मोहन व मनीषा केसरेकर यांची मुले सहभागी झाली होती. आई-वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आलेल्या संकटाची व्यथा उपस्थितांसमोर मांडताना कुटुंबीय भावूक झाले.
लक्ष्मी मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा
मोर्चाला लक्ष्मी मंदिरापासून सुरुवात झाली. घोडे गल्ली, स्टेशन रोड मार्गे मोर्चा शिवस्मारक सर्कल येथे पोहोचला. तेथे आंदोलकांनी मानवी साखळी करून निषेध नोंदविला. आरोपीविरोधात घोषणाबाजी करत केसरेकर कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला.
ग्रेड-२ तहसीलदार एस. के. तंगोळी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. निवेदनावर तातडीने कार्यवाही करून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार हलगेकरांकडून दोन लाखांची मदत
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घटनेचा तीव्र निषेध केला. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि केसरेकर कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी हलगेकर यांनी वैयक्तिकरित्या दोन लाख रुपयांचा धनादेश केसरेकर कुटुंबाला दिला. तसेच खानापुरात समिती स्थापन करून शिष्टमंडळामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येईल आणि कुटुंबासाठी २५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
अरविंद पाटील यांचा इशारा
माजी आमदार अरविंद पाटील यांनी केसरेकर कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली. महाराष्ट्रात रोजगारासाठी गेलेल्या कर्नाटकातील नागरिकांना भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्याविरोधात लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी कुटुंबाला ५० हजार रुपयांची वैयक्तिक मदत जाहीर केली.
भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी यांनीही घटनेचा निषेध केला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत त्यांनी ११ हजार रुपयांची मदत जाहीर केली.
सरकारने कुटुंबाचे पालकत्व स्वीकारावे
पंडित ओगले यांनी सरकारने केसरेकर कुटुंबाचे पालकत्व स्वीकारावे, घरावरील कर्ज माफ करावे तसेच आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव करून त्यातून मिळणारी रक्कम कुटुंबाला देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांनी स्वतःकडून ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली.
केसरेकर कुटुंबीयांच्या वतीने विश्वनाथ केसरेकर आणि मनाली मोहन केसरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या भावना ऐकताना उपस्थित नागरिक भावूक झाले.
नागरिकांकडून आर्थिक मदतीचा हात
मोर्चादरम्यान विविध मान्यवरांनी केसरेकर कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. जोतिबा रेमाणी यांनी २१ हजार, सुरेश देसाई, ॲड. चेतन मनेरीकर, सुनिता पाटील, बाबुराव देसाई, कृष्णा गुरव, संजय कुबल, मल्लाप्पा मारीहाळ, सयाजी पाटील, महाबळेश्वर पाटील आणि प्रल्हाद पाटील यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये, तर प्रशांत लक्केबैलकर यांनी ११ हजार रुपयांची मदत जाहीर केली.
धनश्री सरदेसाई, बसवराज सानीकोप तसेच सनातन संस्थेच्या साधकांनीही केसरेकर कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
विविध संघटनांचा सहभाग
मोर्चात सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, भाजप, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वामी समर्थ भक्त, माजी सैनिक, हेब्बाळ ग्रामस्थ, महिला, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी शंकर बाळाराम पाटील, गुंडू तोपीनकट्टी, किशोर हेब्बाळकर, रेणुका धबाले, प्रकाश गावडे, दत्ता कदम, नितीन पाटील, मारुती पाटील, पंकज कुट्रे आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta