Friday , August 28 2026
Breaking News

राज्यातील १०१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित; बेळगाव जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही

Spread the love

 

८९ तालुक्यांत तीव्र दुष्काळ

बंगळूर : राज्यातील १०१ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने घोषित केले असून, त्यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. यापैकी ८९ तालुक्यांत तीव्र, तर १२ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याची माहिती महसूलमंत्री तथा उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी गुरुवारी विधानसौध येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील कांही तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसला तरी त्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.

१ जून ते १२ ऑगस्टदरम्यान झालेल्या पावसाच्या कमतरतेचा आढावा घेण्यात आला. या काळात १३४ तालुक्यांमध्ये पावसाची तीव्र कमतरता आढळून आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी (ग्राउंड ट्रुथिंग) करण्यात आली. त्यात १०१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यास पात्र असल्याचे स्पष्ट झाले. पुढील काळात दर १५ दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन निकषांनुसार आणखी तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले जातील, असे परमेश्वर यांनी सांगितले.

१९७६ नंतर जून महिन्यात एवढी कमी पर्जन्यमानाची नोंद झालेली नाही. १ जून ते २६ ऑगस्टदरम्यान राज्यात ६६६ मिमी पावसाची अपेक्षा होती; प्रत्यक्षात केवळ ४६५ मिमी पाऊस झाला. अंतर्गत कर्नाटकात ३१ टक्के, दक्षिण अंतर्गत कर्नाटकात ४१ टक्के, मालनाड भागात ३५ टक्के आणि किनारपट्टी भागात २४ टक्के पावसाची कमतरता आहे. २९ जिल्ह्यांतील १९० तालुक्यांमध्ये पावसाची कमतरता असून, १३ तालुक्यांत तीव्र कमतरता आहे.

दुष्काळ घोषित करण्यासाठी केंद्राचे निकष

२०२० मध्ये केंद्र सरकारने दुष्काळ व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. पहिल्या निकषानुसार किमान तीन आठवडे कोरडा कालावधी असणे आवश्यक आहे. दुसऱ्या निकषात पेरणीचे प्रमाण, पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा, भूजल पातळी तसेच तलाव, बंधारे आणि धरणांमधील पाणीसाठ्याचा विचार केला जातो. या निकषांच्या आधारे विभाग स्तरावर प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

दुष्काळ व्यवस्थापनासाठी ६३५ कोटींची तरतूद

पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ११७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी १८९ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून त्यातील निधीही पाणीपुरवठ्यासाठी वापरला जात आहे. चारा किट खरेदीसाठी २५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या पीडी खात्यांमध्ये ३२९ कोटी रुपये उपलब्ध असून हा निधी केवळ दुष्काळ निवारणासाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रकारे दुष्काळ व्यवस्थापनासाठी सुमारे ६३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

एसडीआरएफअंतर्गत यंदा १,२३९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत; मात्र केंद्राकडून अद्याप एकही रुपया मिळालेला नसल्याचे परमेश्वर यांनी सांगितले. यामध्ये राज्याचा हिस्सा ३१० कोटी रुपये आहे. पहिल्या तिमाहीत ४५० कोटी रुपये आणि मिटीगेशन फंडअंतर्गत ३१० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यापैकी ११६ कोटी रुपये आतापर्यंत मंजूर झाले आहेत.

महिनाअखेरीस केंद्राला दुष्काळाचा अहवाल

या महिन्याच्या अखेरीस केंद्र सरकारला दुष्काळासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे हा अहवाल देण्यात येईल. गतवर्षी राज्यात सुमारे ३९ हजार कोटी रुपयांचे दुष्काळी नुकसान झाले होते. त्यापैकी १८ हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी राज्याने केली होती. केंद्राने सुमारे ३,२०० कोटी रुपये मदत दिली होती.

गतवर्षी सर्वोच्च न्यायालयात जावे लागल्यानंतर केंद्राकडून सुमारे ३,५०० कोटी रुपयांची मदत मिळाली होती. यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि राज्यातील जनता तसेच पशुधनाच्या हिताचा विचार करून केंद्राने तातडीने दुष्काळ निवारण निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी स्पष्ट केले.

तीव्र दुष्काळग्रस्त तालुके — ८९

बंगळूर शहर: अनेकल, बंगळूर उत्तर, बंगळूर पूर्व, येलहंका.
बंगळूर ग्रामीण: होस्कोटे, नेलमंगल.
बंगळूर दक्षिण: मागडी, रामनगर.
कोलार: बांगरपेट, कोलार, मालूर, मुलबागीलू, श्रीनिवासपूर, के.जी.एफ.
चिक्कबळ्ळापूर: बागेपल्ली, चिक्कबळ्ळापूर, चिंतामणी, गौरीबिदनूर, गुडीबंडे, शिडलघट्ट, चेलूर, मंचेनहळ्ळी.
तुमकूर: चिक्कनायकनहळ्ळी, गुब्बी, कोरटगेरे, कुनिगल, मधुगिरी, पावगड, सिरा, तुमकूर, तुरुवेकेरे.
चित्रदुर्ग: चळ्ळकेरे, हिरियूर, होसदुर्ग.
दावणगेरे: चन्नगिरी, होन्नाळी, न्यामती.
चामराजनगर: चामराजनगर, गुंडलुपेट, कोळेगाल, यलंदूर, हनूर.
म्हैसूर: हेग्गडदेवनकोटे, हुनसूर, कृष्णराजनगर, म्हैसूर, नंजनगूड, टी. नरसीपूर, सारागूर, साळिग्राम.
मंड्या: कृष्णराजपेट, मळवळ्ळी, मंड्या, नागमंगल, श्रीरंगपटण.
बळ्ळारी: बळ्ळारी, संडूर, कुरुगोड, कांपली.
कोप्पळ: गंगावती, कुकनूर, कनकगिरी.
रायचूर: देवदुर्ग, मस्की, अरकेरा.
बिदर: बिदर, बसवकल्याण, हुमनाबाद, चित्तगुप्पा.
बागलकोट: बागलकोट, बिळगी, जमखंडी, गुळेदगुड्ड, इलकल.
विजापूर: विजापूर, निडगुंदी, कोल्हार.
गदग: गजेंद्रगड.
हासन: अरकलगुड, अरसीकेरे, चन्नरायपटण, हासन, होळेनरसीपूर.
चिक्कमगळूर: अज्जमपूर.
यादगिरी: शहापूर.
विजयनगर: होस्पेट, हदगली, हागरीबोम्मनहळ्ळी, हरपनहळ्ळी.

मध्यम दुष्काळग्रस्त तालुके — १२

बंगळूर ग्रामीण: देवनहळ्ळी.
दावणगेरे: दावणगेरे.
मंड्या: मद्दूर, पांडवपूर.
रायचूर: लिंगसूगूर, रायचूर.
चिक्कमंगळूर: कोप्प, नरसिंहराजपूर, तारिकेरे.
कोडगू: सोमवारपेठ.
उत्तर कन्नड: मुंडगोड, यल्लापूर.

एकूण स्थिती
८९ — तीव्र दुष्काळग्रस्त तालुके
१२ — मध्यम दुष्काळग्रस्त तालुके
१०१ — दुष्काळामुळे प्रभावित एकूण तालुके

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटकात कृत्रिम पनीरवर एक वर्षासाठी बंदी; अन्न सुरक्षा विभागाचा आदेश

Spread the love  बेळगाव : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कर्नाटकात कृत्रिम पनीर अर्थात ‘अनालॉग पनीर’च्या वापरावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *