Thursday , August 27 2026
Breaking News

रक्षाबंधन, श्रावणी शुक्रवारनिमित्त बेळगावच्या बाजारपेठेत खरेदीची लगबग

Spread the love

 

बेळगाव : श्रावणी शुक्रवार आणि रक्षाबंधन या सणांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. रक्षाबंधनानिमित्त राख्या तसेच बहिणींसाठी विविध भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी वर्दळ पाहायला मिळाली.

बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणून रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे. सणाच्या पूर्वसंध्येला गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली यांसह शहरातील विविध बाजारपेठांमध्ये राख्या आणि भेटवस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

दरम्यान, श्रावणी शुक्रवारनिमित्त महिलावर्गाकडून लक्ष्मी व्रत केले जाते. यंदा तिसरा श्रावणी शुक्रवार आणि पौर्णिमा असा योग जुळून आल्याने पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग वाढली होती. पाने, फुले, फळे तसेच विविध पूजासाहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. गणपत गल्ली परिसरात फळे आणि फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याचे चित्र होते.

शहापूर परिसरातही सायंकाळच्या सुमारास खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभर पावसाचा शिडकावा सुरू असला तरी सायंकाळी पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने बाजारपेठेकडे धाव घेतली. परिणामी शहरातील काही प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि खरेदीची लगबग यामुळे शहरातील वातावरणाला उत्सवी रंग चढला होता.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी महिला मंडळातर्फे कुंकुमार्चन संपन्न

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : श्रावण मास निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे वैश्यवाणी महिला मंडळातर्फे समादेवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *