
बेळगाव : जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांच्यावर ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने महत्त्वाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. कर्नाटक पंचायत राज आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘ई-स्वत्तू’ तांत्रिक कक्षाच्या कामकाजासाठी त्यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ई-स्वत्तू तांत्रिक कक्षातील प्रशासकीय तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी राहुल शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच पीएमयू (PMU) कक्ष आणि सरकार यांच्यात प्रभावी समन्वय साधण्याचे कामही ते पाहणार आहेत.
यासंदर्भात ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या सचिवांनी आदेश जारी केला आहे. बेळगाव जिल्हा पंचायत सीईओ म्हणून कार्यरत असतानाच राहुल शिंदे यांच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर सरकारने दाखविलेला विश्वास म्हणून याकडे पाहिले जात आहे.
ई-स्वत्तू व्यवस्थेतील तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या नियुक्तीचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे.

Belgaum Varta Belgaum Varta