
खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर यांच्या वतीने आज मराठी भाषा आणि व्याकरणाच्या गाढ अभ्यासक, वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झालेल्या प्राध्यापिका यास्मिन शेख [पूर्वाश्रमी जेरूषा रूबेन] यांना अत्यंत आदराने ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय “मराठी भाषा मंचच्यावतीने” भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या विशेष शोकप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना यास्मिन शेख यांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला.मराठी भाषा शिकताना आणि शिकवताना भाषेवर किती निखळ आणि प्रांजळ प्रेम करावे हे यास्मिन ताईंकडून शिकावे, त्यांनी आवर्जून हे ही सांगितले की, शेख ताईनी आपले संपूर्ण जीवन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, व्याकरण शुद्धतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी समर्पित केले. मराठी भाषेचे उच्चारशास्त्र, ‘ष’ काराचे महत्त्व आणि भाषेतील ‘ह’कारांची संपत्ती याविषयी त्यांनी दिलेले मार्गदर्शन आजही तितकेच मार्गदर्शक ठरणारे आहे. मुंबईच्या ‘एसआयएसी’ संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी भाषेचे दिलेले संस्कार आणि त्यांचा भाषेविषयीचा उदारमतवादी दृष्टिकोन नव्या पिढीसाठी कायम प्रेरणादायी राहील. “यास्मिन ताईंची संपती आणि ओळख म्हणजे त्यांचं मराठी भाषेचं प्रेम होतं” असंही ते म्हणाले.
या श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक
प्रा. श्रीमती सुनिता सी. कणबरकर, प्रा. पुंडलिक व्ही. कर्लेकर, प्रा. तात्याजी आर. जाधव, प्रा. रूद्राप्पा व्ही. मरीत्तमण्णावर, प्रा. मंगल देसाई, प्रा. श्रीमती वनिता एम. गावडे, प्रा. श्रीमती जयश्री एफ. शिवटणकर, प्रा. नितीन देसाई, प्रा. प्रशांत पांखरे
तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
भाषिक समृद्धीचा वारसा जपणारी एक ऋषितुल्य व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी त्यांच्या विचारांचा आणि व्याकरणाचा हा दीप असाच तेवत राहील.

Belgaum Varta Belgaum Varta