
बेळगाव : मूळ जमीन मालक असल्याचे भासवून दुसऱ्याच्या नावावर असलेली शेती जमीन परस्पर विक्री करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून ६४ वर्षीय व्यक्तीला बेळगाव शहरातील मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख आनंद मोरे (६४), कलमेश्वर गल्ली, सोनारवाडी, खानापूर तालुका, बेळगाव जिल्हा अशी झाली आहे.
याप्रकरणी उद्यमबाग, बेळगाव येथील चंद्रकांत रामचंद्र बडमंजी (६४) यांनी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक २५०/२०२५ दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उचगाव होबळीतील कोंडाळ गावाच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक ६०/*/१३ मधील एक एकर कृषी जमीन तक्रारदारांनी गणपती शंकर गवळ आणि मारुती देवज गवळ यांच्याकडून खरेदी करून आपल्या ताब्यात ठेवली होती.
ही जमीन बळकावण्याच्या उद्देशाने आरोपी आनंद मोरे याने १६ जुलै २०२५ रोजी बेळगाव दक्षिण उपनिबंधक कार्यालयात खरेदीखताची नोंदणी केली. त्यानंतर तक्रारदारांच्या मालकीची जमीन अन्य व्यक्तीच्या नावावर विक्रीखत करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी आनंद मोरे याला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
मार्केट उपविभागाचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलीस ठाण्याचे पीआय जे. एम. कालमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पीएसआय मणिकंठ पूजारी, एच. एल. केरूर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
आरोपीच्या अटकेसह प्रकरणाचा तपास सुरू असून, बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta