
बेळगाव : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कळ्ळोळी गावात घडली.
या घटनेत गुजनट्टी गावातील रमेश हणमंत बंट्रोळी यांचा मृत्यू झाला असून, कळ्ळोळी येथील बनप्पा रामचंद्र वडेर याच्यावर हत्येचा आरोप आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश बंट्रोळी आणि बनप्पा वडेरची पत्नी लक्ष्मी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा बनप्पाला संशय होता. दोघे एकत्र असलेला फोटो रमेशने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता. हे स्टेटस पाहिल्यानंतर बनप्पा संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गत सोमवारी कळ्ळोळी गावाच्या हद्दीतील शेतात रमेश यांच्यावर बनप्पाने कुऱ्हाडीने हल्ला केला. डोक्यावर आणि मानेवर गंभीर वार केल्याने रमेश यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या घटनेप्रकरणी घटप्रभा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta