
बेळगाव : माजी मंत्री तथा बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी बेळगाव येथील आपल्या गृह कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या तक्रारींना प्रतिसाद दिला.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक गृह कार्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक समस्यांबाबत अर्ज साद केले.
लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रत्येक नागरिकाची समस्या संयमाने ऐकून घेत अर्जातील विषयांची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाहीबाबत सूचना दिल्या.
पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी, वीज, निवास, महसूल, पेन्शन, सरकारी योजना व सुविधांसह विविध समस्यांबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली. काही समस्यांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती देत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची नियमानुसार तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजना व सुविधांचा लाभ मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तातडीच्या स्वरूपाच्या समस्यांना प्राधान्य देऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
“जनतेच्या समस्या ऐकून घेऊन शक्य तितका तोडगा काढणे ही आपली जबाबदारी आहे. कोणताही पात्र नागरिक सरकारी सुविधांपासून वंचित राहता कामा नये. नागरिकांनी आपल्या समस्या थेट आमच्यापर्यंत मांडाव्यात,” असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
यावेळी युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.

Belgaum Varta Belgaum Varta