
बेळगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात २४ तास दारूबंदी लागू करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांततेला गालबोट लागू नये, यासाठी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दारू विक्रीवर निर्बंध घालण्याचा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार बुधवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बेळगाव शहर व तालुक्यातील सर्व मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत दारू दुकाने, बार, क्लब तसेच हॉटेलमधील बारमध्ये मद्यविक्री करता येणार नाही.
यासोबतच मद्याची विक्री, वाहतूक आणि वितरणावरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन व पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दारूबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे संबंधित मद्यविक्रेते, बार व हॉटेलचालकांनी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta