
झाडांच्या फांद्या तोडण्यासह वीज बिल कमी करण्याची ही मागणी
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर येथील शिवाजी रोडवरील विद्युत वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच विद्युत वाहिन्यांना धोकादायकरीत्या लागलेल्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हेस्कॉमकडे करण्यात आली. यासंदर्भात मंगळवारी (दि. २५) रोजी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शिवाजी रोड परिसरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांना लागल्याने वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांकडून विद्युत रोषणाई तसेच गणेशमूर्तींच्या मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे विद्युत वाहिन्या आणि झाडांच्या फांद्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी गणेशोत्सवापूर्वीच संबंधित झाडांच्या फांद्यांची छाटणी करून विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती व देखभाल पूर्ण करावी, अशी मागणी समितीने केली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज बिल कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांच्या वीज वापरानुसार योग्य मीटर तपासणी करून अवाजवी बिलांची समस्या दूर करावी, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी हेस्कॉमचे एसडीए प्रमोद मेत्री यांनी गणेशोत्सवापूर्वी येळ्ळूर परिसरातील संबंधित समस्या दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वामन पाटील, कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, रमेश मेणसे, महेश जुवेकर, यल्लुप्पा पाटील, बी. एन. मजुकर, राजू पावले, कृष्णा शहापूरकर, रमेश धामणेकर, सूरज गोरल, बाळकृष्ण पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta