Tuesday , August 25 2026
Breaking News

रेशन सर्व्हरच्या समस्येने दुकानदार, लाभार्थी त्रस्त; वितरण व्यवस्था ठप्प

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशन) सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने बेळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांसह लाभार्थीही त्रस्त झाले आहेत. एका लाभार्थ्याचा अंगठा घेऊन रेशन वितरणाचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी १५ ते २० मिनिटांपासून तब्बल एक तासापर्यंत वेळ लागत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे.

राज्यभर रेशन धान्याची उचल उशिराने झाल्याने महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही अनेक रास्तभाव दुकानांमध्ये धान्य पोहोचलेले नाही. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली सर्व्हरची समस्या पुन्हा गंभीर झाल्याने नागरिकांना रेशन मिळवण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

या समस्येकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी सरकारी रेशन दुकानदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा विभागाच्या वतीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाचे बेळगाव उपसंचालक मल्लिकार्जुन नायक यांना निवेदन देण्यात आले. सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून रेशन वितरण सुरळीत करण्याची मागणी संघटनेने केली.

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांत एवढी गंभीर सर्व्हर समस्या कधीच निर्माण झाली नव्हती. काही ठिकाणी एका लाभार्थ्याच्या रेशन कार्डावरील व्यवहार पूर्ण करण्यासाठी तब्बल एक तास लागत असल्याने दिवसभरात मोजक्याच लाभार्थ्यांना धान्य वितरित करणे शक्य होत आहे.

दुकानदार सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्रीपर्यंत दुकाने सुरू ठेवत असतानाही सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे व्यवहार पूर्ण होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांमध्ये दुकानदारांविषयी गैरसमज निर्माण होत असून, प्रत्यक्षात सर्व्हरच्या समस्येमुळेच वितरणात अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-केवायसीची प्रक्रिया आणि सर्व्हरवरील वाढता ताण यामुळे समस्या आणखी गंभीर झाल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे. पुढील दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सोडवून रेशन वितरण सुरळीत न केल्यास बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तभाव दुकान मालकांच्या वतीने अहोरात्र धरणे सत्याग्रह सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

यावेळी बेळगाव जिल्हा व तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलादनिमित्त बेळगावात वाहतूक मार्गात मोठे बदल; २६ ऑगस्टला सकाळी ८ पासून निर्बंध

Spread the love बेळगाव : ईद-ए-मिलाद सणानिमित्त २६ ऑगस्ट रोजी बेळगाव शहरात मिरवणूक काढण्यात येणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *