Saturday , October 24 2026
Breaking News

प्रेमाच्या धाग्याने सजली बाजारपेठ; रक्षाबंधनासाठी राख्यांची रेलचेल

Spread the love

 

बहिणींची भावाच्या आवडीची राखी निवडण्यासाठी लगबग; कार्टून, लाइटिंगसह अँटिक राख्यांना विशेष पसंती

बहिण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधताना बहिणीच्या डोळ्यांत उमटणारे प्रेम आणि भावाच्या चेहऱ्यावर खुलणारे समाधान या भावनिक क्षणाची आतुरता आता बाजारपेठेतही जाणवू लागली आहे. रंगीबेरंगी, आकर्षक आणि वैविध्यपूर्ण राख्यांनी बाजारपेठा सजल्या असून, राखी खरेदीसाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे.

शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा साजरी होणार आहे. त्यामुळे भावाच्या आवडीची राखी निवडण्यासाठी बहिणींकडून विविध दुकानांमध्ये गर्दी केली जात आहे. साध्या पारंपरिक राख्यांपासून अत्याधुनिक डिझाइनच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता बाजारात उपलब्ध आहे. पारंपरिक गोंड्याच्या राख्यांसोबत विविध रंग, आकार, नक्षी आणि आकर्षक डिझाइनच्या राख्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अगदी कमी किमतीपासून तब्बल 500 रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत.

भावाच्या आवडीची राखी निवडण्याची लगबग

राखी हा केवळ हातावर बांधला जाणारा धागा नसून, तो बहिणीच्या प्रेमाची, भावाच्या संरक्षणाची आणि आयुष्यभर टिकणाऱ्या नात्याची आठवण असतो. त्यामुळे भावाच्या आवडीची राखी निवडण्यासाठी बहिणींकडून विशेष काळजी घेतली जात आहे. लहानग्या भावापासून तरुण भावापर्यंत प्रत्येकाच्या आवडीनुसार राख्यांची निवड केली जात आहे.

कार्टून, लाइटिंगच्या राख्यांनी वेधले बालचमूचे लक्ष

यंदा लहान मुलांसाठी उपलब्ध असलेले कॉम्बो पॅक राखी विशेष आकर्षण ठरत आहे. आवडते खेळणे किंवा कार्टूनसोबत राखी असा अनोखा मेळ असलेल्या कॉम्बो पॅकला बालचमूकडून मोठी पसंती मिळत आहे. त्याचबरोबर प्रकाशझोतात चमकणाऱ्या लाइटिंग राख्यांनीही मुलांना भुरळ घातली आहे.

बालगणेश, छोटा भीम, बाल हनुमान, महादेव, श्रीकृष्ण यांसह डोरेमोन, मोटू-पतलू, स्पायडरमॅन, शिवा आदी कार्टून व सुपरहिरो थीमच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. भावाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी बहिणींकडून त्याच्या आवडीच्या पात्राची राखी निवडली जात आहे.

तरुणाईला नाजूक आणि अँटिक राख्यांची पसंती

तरुणांसाठी यंदा रेशीम धाग्यातील नाजूक, साध्या आणि अँटिक लूकच्या राख्यांना विशेष पसंती मिळत आहे. मोठ्या आकाराच्या राख्यांपेक्षा आकर्षक, एलिगंट आणि नाजूक डिझाइनच्या राख्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे राखी बाजारात पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचीही झलक पाहायला मिळत आहे.

दरवाढीचा किरकोळ परिणाम; प्रेमाच्या धाग्यासाठी खरेदी मात्र जोमात

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत राख्यांचा पुरवठा कमी असल्याने दरामध्ये किंचित वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, राखीच्या किमतीपेक्षा भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा बांधण्याची भावना मोठी असल्याने खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

राखीसोबत भेटवस्तूंचीही बाजारात रेलचेल

राखी बांधल्यानंतर बहिणीला प्रेमाची भेट देण्याची भावांचीही परंपरा असल्याने भेटवस्तूंच्या खरेदीलाही वेग आला आहे. चॉकलेट, मिठाई, दागिने, सौंदर्यविषयक वस्तू, ट्रेंडिंग गिफ्ट्स यांसह विविध आकर्षक भेटवस्तूंची दुकाने बाजारपेठेत सजली आहेत.

राखीचा एक छोटासा धागा… पण त्यात गुंफलेले असते बालपण, आठवणी, भांडणं, प्रेम, काळजी आणि आयुष्यभराची साथ. त्यामुळेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठेत केवळ राख्यांची खरेदी-विक्री होत नसून, बहिण-भावाच्या अतूट नात्याच्या भावनांनाही उजाळा मिळत आहे. बाजारपेठेत फुललेल्या रंगीबेरंगी राख्या आणि खरेदीसाठी झालेली लगबग पाहता, रक्षाबंधनाचा सण यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र आहे.

About Belgaum Varta

Check Also

वेदांत फाउंडेशनतर्फे गवळीवाडा गाव दत्तक

Spread the love  ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ; शिक्षण, सामाजिक उपक्रमांतून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प खानापूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *