Tuesday , August 25 2026
Breaking News

वाहतूक नियमांची पायमल्ली; उत्तर विभागात आठवडाभरात पावणेदोन कोटींचा दंड

Spread the love

 

बेळगावसह पाच जिल्ह्यांत १७,६३२ वाहनचालकांवर कारवाई; ७८.५८ लाखांचा दंड वसूल

बेळगाव : वाहतुकीला शिस्त लागावी आणि रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी वाहतूक नियमांची अंमलबजावणी केली जात असतानाही वाहनचालकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. उत्तर विभागातील पाच जिल्ह्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १७ हजार ६३२ वाहनचालकांवर आठवडाभरात कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७८ लाख ५८ हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली.

बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड आणि गदग जिल्ह्यांत १७ ते २३ ऑगस्ट या कालावधीत मोटार वाहन कायद्यांतर्गत विशेष वाहतूक कारवाई मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली.

विशेषतः विना हेल्मेट दुचाकी चालविणे, सीट बेल्ट न लावता वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे यांसह विविध नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जिल्हानिहाय कारवाईचा विचार करता बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ४,८४५ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, संबंधित वाहनचालकांकडून तब्बल २० लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून वाहनचालकांसह इतर नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील ही कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धांना सुरूवात

Spread the love  येळ्ळूर : जीवनात मन आणि मनगट घट्ट असेल तर ती व्यक्ती यशस्वी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *