Tuesday , August 25 2026
Breaking News

साखर साठेबाजीला लगाम; ४ हजार क्विंटलची कमाल मर्यादा

Spread the love

 

दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा दणका; ३० दिवसांपेक्षा अधिक साठा केल्यास कारवाई

बेळगाव : साखरेच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. साखर व्यापारी, घाऊक वितरक आणि संकलन केंद्रांवर साठवणुकीची कडक मर्यादा घालण्यात आली असून, कोणत्याही व्यापाऱ्याला ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसेच एका वेळी ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखर साठविल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

१ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. साखरेच्या खरेदी-विक्रीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढीला खतपाणी घालणाऱ्या साठेबाजीवरही सरकारची नजर राहणार आहे.

जिल्ह्यातील साखर व्यापारी, घाऊक वितरक, संकलन केंद्रे आणि संबंधित संस्थांना या संदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. साखर ज्या दिवशी साठ्यात दाखल होईल, त्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत तिची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक साठा करून ठेवता येणार नाही.

याशिवाय प्रत्येक व्यापाऱ्याला फूड स्टॉल पोर्टलवर आपल्या साखर साठ्याची अचूक माहिती जाहीर करणे आणि ती नियमितपणे अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे साखरेच्या साठ्याची माहिती प्रशासनाच्या थेट निगराणीखाली राहणार आहे.

निर्बंधांचे उल्लंघन, साठ्याची माहिती लपविणे अथवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साखर साठवून ठेवणे महागात पडणार आहे. नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा विभागाच्या उपसंचालकांनी दिला आहे.

दरवाढीच्या काळात साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचविणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रेमाच्या धाग्याने सजली बाजारपेठ; रक्षाबंधनासाठी राख्यांची रेलचेल

Spread the love  बहिणींची भावाच्या आवडीची राखी निवडण्यासाठी लगबग; कार्टून, लाइटिंगसह अँटिक राख्यांना विशेष पसंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *