
बेळगाव : सार्वजनिक हिताचे रक्षण करताना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने शहरातील पथविक्रेत्यांनी महापालिकेला सहकार्य करून सौहार्दाचे वातावरण कायम ठेवावे, असे आवाहन महापौर प्रीती कामकर यांनी केले.

मंगळवारी बेळगाव महानगरपालिकेत झालेल्या तात्पुरत्या पथविक्रेता समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. रस्ते व पादचारी मार्ग वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या वापरासाठी मोकळे ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पथविक्रेत्यांच्या हिताचेही संरक्षण झाले पाहिजे. यासाठी नगरसेवक, महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांशी सहकार्याची भूमिका ठेवून आपल्या मागण्या मांडाव्यात, असे महापौरांनी सांगितले.
उपमहापौर हनुमंत कोंगाळी म्हणाले की, पथविक्रेत्यांनी नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य केल्यास केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेकडून उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधा मिळविणे सुलभ होईल.
महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी व्यवसायासाठी योग्य जागांची पाहणी करून त्यातील साधक-बाधक बाबींवर चर्चा केली जाईल. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
बैठकीत समिती सदस्यांनी पथविक्रेत्यांच्या विविध समस्या मांडून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष रमेश मैलुगोळ, राजू भातकांडे, श्रेयस नाकाडी, नगरसेवक सविता कांबळे, गिरीश धोंगडी, महापालिका विकास विभागाच्या उपआयुक्त लक्ष्मी निप्पाणीकर, प्रशासन विभागाचे उपआयुक्त उदयकुमार टी.बी., नगर नियोजन अधिकारी वाहिद अख्तर, अभियंता अनूप, सीएओ गीता तसेच पथविक्रेता समितीचे पदाधिकारी श्रीपाद होळकर, मोहम्मद अली भागवान, विजय चौहान, चंद्रव्वा देसूरकर आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta