Friday , August 28 2026
Breaking News

देशसेवेत रमलेल्या वीर मनगटावर म. मं. ताराराणीच्या लेकींची उमटली रेशीम धाग्यांची साक्ष

Spread the love

 

म. मं. ताराराणी महाविद्यालयात रक्षाबंधन सोहळा अनोख्या देशभक्तीने साजरा

खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व कॉलेजच्या सभागृहात देशाचे रक्षण करणाऱ्या वीर आजी -माजी सैनिकांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधनाचा सण अत्यंत भावूक, देशभक्तीपर आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमाला बहुसंख्येने खानापूर परिसरातील सैनिक उपस्थित होते.
हा भावनिक बंधाचा सोहळा देशसेवेच्या मनगटावर रेशीम धाग्यांची साक्ष बांधून साजरा केल्यामुळे मागिल काही वर्षापासून मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताईंनी वीर जवान व आपल्या देशाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या “जय हिंद” नाऱ्याला समर्पणाची पुन्हा एकदा नवी ताकद मिळाली आहे.
“रेशमाच्या धाग्यांनी जोडले आहे हे नाते, ज्याचे मोल जगातील कोणत्याही गोष्टीने होऊ शकत नाही” आणि “भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं व रक्षणाच्या विश्वासाचं पर्व” या उदात्त भावनेतून हा सोहळा पार पडला.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात प्राध्यापक श्री. पी. व्ही. कर्लेकर यांनी रक्षाबंधनाचा पौराणिक इतिहास सांगून राष्ट्राच्या सुरक्षेत सैनिक हा केवळ गणवेशातील व्यक्ती नसून देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारा राष्ट्रसेवक असल्याचे स्पष्ट केले. यानंतर प्राध्यापक श्री. टी. आर. जाधव यांनी कारगिल युद्धातील सैनिकांचे शौर्य व त्यागावर प्रकाश टाकत उपस्थिती वीरांच्या त्यागाला मानवंदना दिली.
सोहळ्याच्या मुख्य टप्प्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्राचार्यांसह उपस्थित देशवीरांना कॉलेजची जी एस कुमारी वैशाली गुरव, इतर विद्यार्थिनी प्रतिनिधी आफरीन सनदी, सुहाना नालबंद, जोया सनदी, अन्वेषा माने, पलक मकानदार, सोनी केरकर यांनी राखी बांधून त्यांच्याप्रति आदर, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त केला तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांनी सर्व पुरुष प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना राखी बांधून बंधुभावाचा संदेश दिला. सीमावर्ती भागात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सणाच्या विविध रूपांची माहितीही यावेळी देण्यात सुभेदार एन. बी. झुंजवाडकर (खानापूर माझी सैनिक संघटनेचे डायरेक्टर): देशसेवेपेक्षा मोठा कोणताही सन्मान नाही. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना बहीण जेव्हा राखी बांधते, तेव्हा तो केवळ धागा नसून संपूर्ण देशाचा विश्वास असतो. युवक-युवतींनी या पवित्र धाग्याचे मर्म ओळखून भारतीय सैन्यात भरती व्हावे,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
सुभेदार गोपाळराव देसाई (कार्याध्यक्ष, माजी सैनिक संघटना व म. ए. समिती, अध्यक्ष): “रक्षाबंधनाचा सण हा केवळ धाग्यापुरता मर्यादित नसून तो रक्षणाच्या प्रतिज्ञेशी जोडलेला आहे. जशी बहीण आपल्या भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करते, तसाच सैनिक अहोरात्र देशाच्या रक्षणासाठी उभा असतो. कारगिल युद्ध आणि अमृतसर सुवर्ण मंदिरातील कारवाईतील (ऑपरेशन ब्लू स्टार) प्रत्यक्ष अनुभवावरून सैनिकांचे जीवन म्हणजे देशासाठी घेतलेली अतुट प्रतिज्ञा असते,” असे विचार त्यांनी मांडले.

प्राचार्य श्री.अरविंद एल. पाटील (अध्यक्षीय भाषण): स्वतःचे भावूक अनुभव सांगताना ते म्हणाले, “1998 मध्ये आपली भारतीय सैन्यात ‘एज्युकेशनल हवालदार’ म्हणून निवड झाली असताना केवळ आईच्या इच्छेखातर आपण सैन्यात रुजू होऊ शकलो नाही. परंतु 1999 मध्ये केंद्रीय विद्यालयात इंग्रजी शिक्षक पदाची मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर, कारगिल युद्धात शहीद झालेल्या केरळमधील एका सैनिकाच्या मुलाप्रती आदर व्यक्त करत मी ती संधी स्वेच्छेने सोडली आणि सैनिकांच्या त्यागाचा सन्मान केला. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना राखी बांधणे आणि त्यांच्या रक्षणाचे व त्यागाचे चीज करणे हीच खरी रक्षाबंधनाची भावना आहे.”
या विशेष प्रसंगी माजी सैनिक संघटना खानापूरचे सुभेदार प्रकाश गवसेकर (उपाध्यक्ष), नायब सुभेदार देवप्पा पाटील, नायब सुभेदार संतन शावेज बारगज, हवालदार गणपत पाटील, हवालदार राजाराम देवलतकर, हवालदार महादेव तिरवीर, हवालदार मनोहर लक्ष्मण हट्टीकर व हवालदार संदीप अंधारे उपस्थित होते.
याप्रसंगी कॉलेजचा सर्व कर्मचारी वर्ग ज्येष्ठ प्राध्यापक श्री. एन. ए. पाटील, श्रीमती मंगल देसाई, श्रीमती सुनिता कणबरकर, श्री आर. व्ही. मरीत्तमण्णावर, श्रीमती वनिता गावडे, श्री नितीन देसाई, श्री प्रशांत पाखरे आणि शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती चित्रा अर्जूनवाडकर श्रीमती आर. पी. धबाले, सीमा पाटील, सातेरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापिका जयश्री शिवणकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात राखीच्या धाग्यातून स्वयंरोजगार अन् सृजनशीलतेचा सुंदर फुलला संगम

Spread the love  खानापूर : भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि रक्षणाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *